नितिन निमकर nvncom@yahoo.com हे असं कळवतात-
बरहा, जीमेलच्या सुविधा या पैकी कोणताच वापर न करता मी हे सगळे फेसबुकवर मराठीतच लिहीत आहे. मी जवळ जवळ इंग्रजीमधे जसे काम करतो तसेच मराठीतही काम करतो आहे. यासाठी मी कोणतीही दुसरी व्यवास्था वापरत नाही.
या माझ्या संगणकावर मी अगदी चक्क नोट पॅडवर मराठी लिहतो. मला त्यात कोणतीच अडचण येत नाही. नोटपॅडवर मराठीत लिहिणे म्हणजे संगणकात अगदी मूळ पद्धतीत मराठी लिहिणे आणि ती साधी टेक्स्ट फाईल म्हणून साठवता येते. फक्त फाईलचा प्रकार ANSI वरुन बदलून युनिकोड करायला हवा. या साठी खालील गोष्टी करायला हव्यात.
1) संगणकावर मराठी युनिकोड चालू करायला हवे.
2) तुम्हाला इनस्क्रिप्टचा कळ फलक समजून घ्यायला हवा जो तुम्ही 5/10 मिनटात शिकू शकता कारण तो आपण जसे मराठी हाताने लिहितो तसेच काम करतो. उदा: क कला कान्हा का कानाची कळ स्वतंत्र आहे. शिवाय कळफलकावरची मराठी अक्षरांच्या जागा अगदी तर्कशुद्ध ठिकाणी आहेत. म्हणजे क ला शिफ्ट दाबलेत की ख येतो. या साठीची शिकवणी http://www.ildc.in च्या संकेतस्थळावरती आहे. ती उतरवून घेऊन सवय करता येईल.
3) मराठीत टंकन करण्याचे 6/7 कळफलक आहेत हा दुर्दैवाचा भाग आहे पण अनेकांना वेगवेगळ्या कळफलकांची सवय झालेली असल्याने त्यांना इनस्क्रिप्ट कळफलक शिकायचा त्रास टाळायचा असल्यास मायक्रोसॉफ्टच्या भाषा संकेत स्थळावरती आय एम ही आज्ञावली फुकट ठेवली आहे ती उतरवून आपल्या संगणकावर बसवल्यास 6/7 प्रकारचे कळफलक एकत्र मिळतात. यात फोनेटिक म्हणजे इंग्रजीतून मराठी टाईपिंग पासून पूर्वी जे रेमिंग्टन टाईपरायटरवर काम करायचे त्यांचीही सर्व सोय होते. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणताही कळ फलक वापरलात तरी अक्षर मराठी युनिकोड मराठीतच असते. या 6/7 कळफलकांचा वापर करुन तुम्ही नोट पॅड पासून सर्व आज्ञावल्यांमधे मराठीत काम करु शकता.
संगणकावर मराठी युनिकोड कसे चालू करावे आणि आय एम ई कसे बसवावे हे सांगणारी चित्रमय शिकवणी मी माझ्या संस्थेच्या संकेत स्थळावर ठेवली आहे. पत्ता असा आहे : http://www.quest.org.in/Unicode/Start_Unicode_English.exe या दुव्यावर गेल्यावर ही शिकवणी उतरवून घेतांना ही EXE फाईल असल्याने ती धोकादायक असल्याचे ब्राऊझर किंवा तुमचे विषाणू रोधक सांगेल त्या कडे दुर्लक्ष करा आणि फाईल उतरवून ध्या. ही फाईल ऍडोबी फ्लॅश मधे केली असल्याने तिच्या बरोबर ती चालणारा प्लेअर त्याच्या बरोबर दिला आहे त्यामुळे ती फाईल .exe झाली आहे. साधारणत: .exe या फाईल्स धोकादायक असल्याचे विषाणू रोधक सांगतात. काळजी करु नये. प्रथम मी नुसती .swf फाईल ठेवली होती. पण अनेकांनी प्लेयर नसल्याने ती चालत नसल्याचे सांगितले म्हणून सोबत फ्लॅश प्लेयर पण दिला आहे. सदर शिकवणी विंडोज एक्स पी साठी आहे पण व्हिस्टा मधे आणि त्या पुढील आवृत्यांमधे जवळ जवळ अशाच मार्गाने मराठी युनिकोड चालू करता येते.
काही अडचण असल्यास कळवा.
जाता जाता: http://www.quest.org.in/ या माझ्या संस्थेच्या संकेत स्थळावरती मी ड्रुपल वापरुन इंग्रजी आणि मराठी संकेतस्थळ एकाचा ठिकाणी केले आहे. मुख्य पानाच्या उजव्या बाजूला असलेल्या भाषा निवडीच्या दुव्यावरुन तुम्हाला संकेत स्थळाची भाषा बदलता येते. मराठी किंवा इंग्रजी अगदी सहज......
No comments:
Post a Comment